खासदार संजय पाटील यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी लढणार आहे – गोपीचंद पडळकर

सांगली – लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘प्रस्थापितांच्या राजकारणाला गाडण्यासाठी आणि मनगटाच्या जोरावर दडपशाही करू पाहणाऱ्या खासदार संजय पाटील यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी लढणार आहे’, असे प्रतिपादन पडळकर यांनी येथे केले.

श्री. पडळकर बुधवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता पुष्पराज चौकात शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करतील. काल आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दीर्घ चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ”मी लढू नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे सारे प्रयत्न सुरू होते. मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी मिळणार होती; मात्र एका बड्या नेत्याने दबाव टाकून त्याला विरोध केला. मी लढणार हे ठरले होते, माझा पक्ष म्हणून वंचित आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. कारण, बहुजनांच्या पोरांनी नुसत्या सतरंज्या उचलायच्या आणि राजकीय घराण्यांनी, प्रस्थापितांनी विधानसभेपासून विधान परिषद, राज्यसभेपर्यंत हक्क जमवायचा, याची मला चीड आहे. या लढाईत वंचितांसह मराठा समाजातील तरुणही माझ्यासोबत असणार आहेत. सत्तेचा उपयोग करून समाजाला वेठीस धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मी अनेकदा खासदार संजय पाटील यांना समजावले होते, मी सोबत आहे तोवर तुमचे ठीक आहे. आता मी त्यांच्यासोबत नाही, आता त्यांचे काही खरे नाही.”

जयसिंग शेंडगे म्हणाले, ”माझी उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र सांगलीत एक तरुण, चांगला कार्यकर्ता आम्हाला मिळतोय, याचा आनंद आहे. त्यातून मी स्वतः माझी उमेदवारी मागे घेतली आणि गोपीचंदच्या रूपाने बहुजनांचा, धनगर समाजाचा एक तरुण ही लढाई हातात घेतोय.”

प्रकाश शेंडगे म्हणाले, ”राज्यातून पहिला धनगर समाजाचा खासदार होण्याची संधी मिळते आहे. त्यात सर्व बहुजन लोक आमच्यासोबत असतील. या मतदारसंघात मुस्लिम, धनगर, लिंगायत, दलितांची मते निर्णायक आहेत आणि ती आमच्यासोबतच आहेत. बहुजन समाजात संताप आहे, तो मतांतून व्यक्त होईल.” सुकुमार कांबळे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे आदी उपस्थित होते.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या