राजू शेट्टींना या निवडणुकीत पाडणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – ” कुणाकडे उसने पैसे मागणे चुकीचे नाही, व्यवसायासाठी दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे घेत होतो, त्याही परिस्थितीत नेमबाज तेजस्विनी सावंत हिला अडीच लाख रूपयांची बंदूक घेऊन दिली. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांनी त्याचे पुरावे असतील तर द्यावेत. उगाच बिंदू चौकात या, बिंदू चौकात या कशाला म्हणता, बिंदू चौक काय न्यायालय आहे का ? “असा सवाल महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 

श्री. शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना श्री. पाटील यांच्यावर बोचरी टिका केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यात श्री. पाटील यांनी पैसे मिळवल्याचे श्री. शेट्टी म्हणाले होते.

श्री. पाटील म्हणाले,”जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मी मदत केली, माझ्यावर आई वडीलांकडूनच चांगले संस्कार आले आहेत. मी चांगला वागतो म्हणूनच मला झोप येण्यासाठी गोळी खावी लागत नाही. तुम्ही अशा किती लोकांना मदत केली? यापुर्वीही माझ्यावर आरोप झाले पण कुणाला सिध्द करता आले नाहीत. श्री. शेट्टी यांनी तसे पुरावे असतील तर द्यावेत उगाच बिंदू चौकात या असे आव्हान देऊ नये. आज मी या आरोपाला इचलकरंजीच्या सभेत उत्तर देणारच आहे.’ 

शेट्टींना पाडणार 

शेती विषयक अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. पण तरीही खासदार राजू शेट्टी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना आरे-तुरे करतात. त्यामुळे श्री. शेट्टी यांच्यावर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रचंड राग आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना पाडणारच आहे, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या