सांगली : कमरेला बंदूक लावून फिरण्यात कसली मर्दानगी – विशाल पाटील

सांगली – तुम्हाला जिल्ह्यातील प्रश्‍न संसदेत मांडण्यासाठी जनतेने दिल्लीत पाठविले आहे. पण तुम्ही कमरेला बंदूक लावून गल्लीत फिरत आहात. यात कसली आली मर्दानगी? तुमची गुंडगिरी तासगावात येऊन मोडून काढू, असा इशारा युवक नेते विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता येथे दिला.सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी स्वाभिमानी पक्षातर्फे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी  त्यांच्यासोबत खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. डॉ. विश्‍वजीत कदम, आ. सुमन पाटील हे उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले,  सांगलीच्या खासदारांनी जनतेसाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी एआयबीपी योजना रद्द केल्याने सिंचन योजनांना मोठ्या प्रमाणात मिळणारा निधी कमी झाला आहे. एआयबीपीतून ताकारी-म्हैसाळसाठी एक हजार कोटी रुपये मिळाले होते. पण प्रधानमंत्री योजनेतून जिल्ह्यातील या योजनेसाठी केवळ 74 कोटी मिळाले आहेत. तर टेंभू योजनेला शून्य  रुपये मिळाले आहेत. सांगलीच्या खासदारांना सिंचन योजनांना निधी आणण्यात अपयश आले आहे. पण त्यांच्या संपत्तीत वाढ करण्यात यश मिळाले आहे. पाच वर्षांत त्यांची संपत्ती दुप्पट झाली आहे. ते पुढे म्हणाले, खासदारांना जिल्ह्यातील प्रश्‍न संसदेत मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी जनतेने दिल्लीत पाठविले आहे. पण ते कमरेला बंदूक लावून गुंडगिरी करतात. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर  आमदार सुमनताई पाटील यांना कोंडून घातले होते. ही कसली मर्दानगी आहे?  पण त्यांना माझी विनंती आहे की, माझ्या आडवे येऊ नका. मी तासगावात येऊन तुमची दादागिरी मोडून काढू शकतो. माझ्या उमेदवारीला ते इतके का घाबरतात? मला उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी  अनेक राजकीय व धार्मिक गुरुंचे पाय धरले.  पण राजू शेट्टी यांच्याकडे ते जाऊ शकले नाहीत.  

आमदार विश्‍वजीत कदम म्हणाले, सांगलीच्या खासदारांनी काय दिवे लावले आहेत? आर. आर. पाटील  यांच्या निधनानंतर सुमनताई पाटील यांना जी वागणूक दिली ती लज्जास्पद होती. जनता ते कदापि विसरणार नाही. 

दादा-बापू गटांचा वाद संपला पाहिजे, असे सर्वांना वाटते आहे. याबाबत बोलून मी चूक केली आहे. त्यामुळे मला सर्वांनी सांभाळून घ्यावे. राजारामबापू व कदम घराण्याने मला सामावून घ्यावे.दादा घराण्यावर केलेले प्रेम कधीच वाया जाणार नाही, याची मी खात्री देतो, असे विशाल पाटील यांनी हात जोडून जयंत पाटील व विश्‍वजीत कदम यांना सांगितले.

विशाल पाटील म्हणाले, खासदारांनी तासगाव तालुक्यातील निम्मा 7/12 आपल्या नावावर करुन घेतला आहे. त्यांचे लक्ष केवळ कुठे जमिनी विकायला निघते याकडेच असते. कुठेही जमीन विकायला निघाली तरी ते निम्म्या दरात घेतात. ते पुन्हा निवडून आले तर जिल्ह्याच्या 7/12 आपल्या नावावर करण्यास कमी करणार नाहीत.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या