मल्ल्याचा भाजपला थेट सवाल – मला फरारी म्हणताच का?

नवी दिल्ली: ‘मी १९९२ पासून ब्रिटनमध्ये राहत आहे, हे सत्य आहे. मग मी भारतातून पलायन केलं, असं भाजप कशाच्या आधारावर म्हणतेय,’ असा टोला बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने भाजपला लगावला आहे. विजय मल्ल्याने ट्विटरवरून भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकारने मी थकविलेली बँकेची सर्व रक्कम रिकव्हर केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. असं असताना भाजपचे प्रवक्ते सातत्याने मला का लक्ष्य करत आहेत, असा सवाल मल्ल्याने ट्विटद्वारे केला आहे. 

मल्ल्याने बँकेचे ९ हजार कोटी रुपये थकविले होते. त्यामुळे त्याची १४ हजार कोटी रुपयांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आल्याचं मोदींनी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याचं मी पाहिलं. उच्चपदस्थ व्यक्तिनेच माझ्याकडील सर्व थकीत रक्कम वसूल केल्याचा खुलासा केला आहे, मग भाजपचे प्रवक्ते मला सातत्याने लक्ष्य का करत आहेत? असा सवालही त्याने केला. 

मोदींच्या वक्तव्यावरून मी केवळ पोस्टर ब्वॉय असल्याचं दिसून येतं. मात्र माझ्याकडून प्रमाणापेक्षा जास्त रक्कम वसूल केल्यामुळे त्यावर बोलताना मोदी विचलित झाले होते, असा दावा करतानाच मी पोस्टर ब्वॉय आहे, हे मला मान्यच आहे आणि मोदींनी माझ्याबाबत जे सांगितलं ते मला ज्ञात आहे, असंही तो म्हणाला.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या