जैन समाजाचा अपमान करणा-या शिवसेनेला धडा शिकवा : मिलिंद देवरा

मुंबई : शिवसेनेने पर्युषण काळात सप्टेंबर 2015 मध्ये जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. हे जैन बांधवांनी विसरता कामा नये, मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी जैन समुदायाला केले आहे.

देवरा यांनी एका कार्यक्रमात जैन समाजाला शिवसेनेने काय त्रास दिला याचा पाढाच वाचून दाखवला. देवरा म्हणाले व्यापारी बांधव मोदींच्या नावावर शिवसेनेला मत देतील असा शिवसेनेचा समज आहे. तो दूर करा, शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी येतील तेव्हा त्यांना जाब विचारण्याचे काम करा, मतपेटीच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्या असे देवरा म्हणाले.

मागील काही वर्षांपासून पर्युषण पर्वाच्या काळात मुंबई आणि आसपासच्या काळात मांसबंदीचा मुद्दा गाजताना दिसला आहे. भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेतील पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला होता. त्याला शिवसेना व मनसेने विरोध केला होता. त्यावेळी जैन समाज शिवसेनेवर नाराज झाला होता.

दक्षिण मुंबईतून देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत निवडणूक लढवत आहे. दक्षिण मुंबईत जैन समाजाची मते महत्त्वाची आहेत. त्यामुळे जैन समाजाची मते कुणाच्या पारड्यात जातात हे महत्वाचे आहे.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या