तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा मध्ये प्रचंड रंगात

जिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्‍यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात  आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा पैरा यंदाच्या लोकसभेत चांगलाच चर्चेत आला आहे. ही आणि पुढची विधानसभेची निवडणूक यात कोणते पैरे प्रस्तावित आहेत, की जे आगामी राजकारणात उलथापालथी घडवणार आहेत.

परवा स्टेशन चौकात गोपीचंद पडळकर यांनी ‘संजयकाका तुम्ही माझा पैरा फेडा’, असे आवाहन केले. त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीच्या परतफेडीनंतर काकांनी विट्यात केलेल्या खेळीबद्दलची ती कोपरखळी होती. खानापूर-आटपाडी मतदारसंघात खासदार पाटील यांनी एकावेळी दोघांशी पैरा केला. एकीकडे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांना त्यांनी  शब्द दिला.

दोघांची मदत घेतली, मात्र पैरा फेडताना त्यांनी सदाशिवरावांना झुकते माप दिले. त्याचीच  आठवण गोपीचंद यांनी परवा करून दिली. आता या  जुन्या पैऱ्याबरोबर आता नवेही पैरे चर्चेला येत आहेत. विशेष म्हणजे, काहींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेगवेगळ्या पातळीवर मदत घेत भाजपला मदतीचा पैरा केला आहे. तो स्थानिक पटावरील मांडणीत अडचणीचा, रंगतदार ठरणार आहे. 

खासदार संजय पाटील यांनी सन २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढताना पैरेच पैरे करून ठेवले. त्यात आमदार विलासराव  जगताप यांचा पैरा त्यांनी फेडला, ते जतचे आमदार  झाले. घरच्या मैदानावर मात्र संजय पाटील यांना अजितराव घोरपडेंचा पैरा फेडता आला नाही. त्यामुळे त्यांचा रोष पत्करावा लागला. आता पाच वर्षांनंतर पुन्हा पाटील-घोरपडे यांच्यात पैरा झाला आहे, त्याची ‘गॅरंटी’ मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

गंमत म्हणजे या पैऱ्याच्या भांडणात खानापूरचे आमदार झालेल्या अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरभरून निधी आणला आणि पैरा म्हणून सांगली लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराचाच प्रचार करेन, अशा शब्द दिला. त्यात कंसात भले तो उमेदवार संजय पाटील असतील तरी, असाही उल्लेख होता. तो पैरा आता अनिल बाबर फेडायला पुढे  सरसावले आहेत. अडचण अशी झालीय, की एकीकडे बाबरांशी नव्याने पैरा करायचा की सदाशिवभाऊं सोबतच नांगर ओढायची, हा गुंता खासदार पाटील यांना सोडवावा लागणार आहे. 

खानापूर-आटपाडीत आणखी एक पैरा रंगत आणतोय. तेथे राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची मदत घेतली आणि पैरा केला, मात्र तो पैरा विधानसभेसाठी होता, असे देशमुखांचे मत आहे. आटपाडीच्या अस्मितेच्या गोपीचंद यांनी भावनिक तारा छेडल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना भाजपशी आणि संजय पाटील यांच्याशी केलेल्या पैऱ्याची अडचण झाली आहे. याच तालुक्‍यात कधीकाळी अनिल बाबर आणि राजेंद्र देशमुख यांच्यातला पैरा चांगलाच गाजला होता.

असो. इकडे सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांनी स्वाभिमानीचे उमेदवार  विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पायाला भिंगरी बांधली आहे. विशाल यांची स्थापना ‘लोकसभे’वर केली गेल्याने आता जयश्रीताईच विधानसभेच्या उमेदवार असतील असे गृहीत धरून त्यांचे कार्यकर्ते चांगलेच पळत आहेत. मात्र त्यांना विशाल यांचे पूर्ण आकलन झालेले नसावे. त्यांची अपेक्षा ही की आता विशाल यांना वहिनींचा पैरा विधानसभेला फेडावा. बघुया. गहू तेव्हा पोळ्या. विशेष म्हणजे हा नवा पैरा माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी वसंतदादांच्या समाधीसमोर घडवून आणलाय.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या