काँग्रेसची अवस्था टायटॅनिकसारखी- मोदी

नांदेड :  ‘काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. हे जहाज रोज बुडत चालले आहे. या जहाजात बसलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षांचीही तीच गत झाली आहे. या जहाजातील नेते मंडळी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताहेत. शरद पवार यावेळी निवडणूक लढत नाहीयेत. त्यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनीही पळ काढला आहे. सगळेच घाबरून मैदान सोडत आहेत’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर हल्ला चढवला.

काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी समृद्ध आणि सुरक्षित अशा नवभारतासाठी पुन्हा एकदा एनडीएला मतदान करा, असे आवाहन जनसमुदायाला केले

काय म्हणाले मोदी ……

  • २०१४ मध्ये जनतेने काँग्रेसला सत्तेतून दूर केले. आता पाच वर्षांनंतरही काँग्रेस व काँग्रेसच्या मित्रपक्षांवरील जनतेचा राग जराही कमी झालेला नाही. गेल्यावेळी ४४ जागांपर्यंत खाली आलेल्या काँग्रेसवरील संकट यावेळी आणखीच गडद झाले आहे
  • काँग्रेस नेतृत्वाची भंबेरी उडाली आहे. निवडणूक लढवण्यासाठी मायक्रोस्कोप घेऊन मतदारसंघ शोधावा लागला आहे. जिथे भारतातील बहुसंख्य अल्पसंख्यक आहेत तिथे हे महाशय लढताहेत. तिथे निघालेली मिरवणूक तुम्ही पाहिलीच असेल. सोशल मीडियावर या मिरवणुकीचे व्हिडिओ झळकलेत. त्यात काँग्रेसचा झेंडा शोधावा लागत आहे. काय अवस्था आहे ही काँग्रेसची?
  • गरज पडली की काँग्रेस खोट्या घोषणांची पेटी खोलते आणि काही दिवसांनी गजनी बनते.
  • महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. जितके आमदार आहेत त्यापेक्षा गट-तट बनले आहेत. आपसातच लढाई सुरू आहे. ही अशी महामिलावट महाराष्ट्राचे भले कसे करणार?
  • शहिदांच्या कुटुंबीयांची कुणी फसवणूक केली हे आठवतंय ना! अशा घोटाळ्यांवर नजर ठेवण्यासाठीच आम्ही रेरा कायदा बनवला आहे. घर खरेदी करणारा आता फसवला जाणार नाही

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या