सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमिरातीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे या जैशच्या दहशतवाद्याला रविवारी विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. तिथून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. डिसेंबर २०१७ मध्ये सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. निसार अहमद या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता.

३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. निसार अहमद जैशचा दक्षिण काश्मीरमधील विभागीय कमांडर नूर तांत्रेचा भाऊ आहे. लीथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयए करत असल्यामुळे निसार अहमदला एनआयएच्या ताब्यात देण्यात आले.

काश्मीर खोऱ्यात जैशला पाय रोऊ देण्यात नूर तांत्रेने महत्वाची भूमिका बजावली डिसेंबर २०१७ मध्ये चकमकीत त्याचा खात्मा झाला. एनआयए कोर्टाने निसार अहमद विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मागच्या काही वर्षात संयुक्त अरब अमिरातीने देशात गुन्हे करुन फरार झालेले आरोपी, दहशतवादी यांना पुन्हा भारताकडे सोपवून खरोखरचे चांगले उदहारण समोर ठेवले आहे.

याआधी सुद्धा यूएईने ऑगस्ट वेस्टलँड लाच प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेल, मध्यस्थ दीपक तलवार, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद, १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख टकला या आरोपींना भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद या वर्षाच्या सुरुवातीला यूएईला निसटला होता.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या