थरकाप उडवणारी ‘ऍनाबेल’ परतली अन्….Annabelle Comes Home trailer

मुंबई : भयपट म्हटल्यावर प्रेक्षकांच्या त्या चित्रपटाविषयी असणाऱ्या अपेक्षा बऱ्याच अंशी वाढलेल्या असतात. अशाच अपेक्षा लक्षात घेत आजवर अनेक भटपट साकारण्यात आले. त्यातीलच अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांची मालिका म्हणजे ‘कॉन्ज्युरिंग’. भयपटांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या मालिकेतील आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील हा सातवा चित्रपट असून, ‘ऍनाबेल कम्स होम’, असं त्याचं नाव आहे. 

Annabelle Comes Home चा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये मागील चित्रपटांपेक्षाही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार असल्याचं प्रतित होत आहे. गॅरी डॉबरमॅन यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शिन क्षेत्रात पदार्पण केल्याचं कळत आहे. यापूर्वी त्यांनी ‘ऍनाबेल’, ‘ऍनाबेल क्रिएशन’ आणि ‘द नन’ या आणि अशा इतर चित्रपटांच्या पटकथा लेखनाची जबाबदारी पार पाडली होती. 

जेम्स वॅन आणि पीटर सॅफ्रान यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून मऍकेन्ना ग्रेस, मॅडिसन, कॅटी सॅरिफ, पॅट्रीक विल्सन आणि वेरा फॅर्मिगा यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ट्रेलरमधील दृश्य आणि एकंदरच कथानकाची गरज पाहता भयपटाला ऍनाबेल कम्स होम आणखी एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवणार असंच स्पष्ट होत आहे. कॉन्ज्युरिंग मालिकेतील यापूर्वीच्या चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळालेला प्रतिसाद पाहता आता याच मालिकेतील नव्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या