मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकल ट्रेनमध्येच मिळणार फ्री वायफाय

तुम्ही मुंबई लोकलने नियमीत प्रवास करत असलात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रोज गर्दीमधून धक्केबुक्के खात होणारा मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अधिक मनोरंजक होणार आहे. मध्य रेल्वे आता स्थानकांबरोबरच थेट लोकल ट्रेनमध्येच वायफायचे हॉटस्पॉट लावणार आहेत. फायनान्स एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ‘इन्फोटेन्मेंट’ म्हणजेच माहिती आणि मनोरंजन या तत्वावर ही सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सध्या मुंबई लोकलने प्रवास करणारे अनेकजण हे मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेले दिसतात. अनेकदा हे प्रवासी डाऊनलोड केलेले सिनेमे पाहत असतात. मात्र आता मुंबईकरांना धावत्या लोकल ट्रेनमध्ये लाइव्ह स्ट्रीमींगच्या माध्यमातून सिनेमे, गाणी, बातम्या, मालिका तसेच क्रिकेटचे सामनेही पाहता येणार आहेत. या वायफाय हॉटस्पॉटच्या चाचण्या सुरु असून जुलै महिन्यामध्ये ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरु आहे.

ही सोय वापरण्यासाठी एक अॅप प्रवाशांना आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे. या अॅपमध्ये अनेक सिनेमे, गाणी, व्हिडीओ आणि इतर कनटेंट प्री लोडेड असणार आहे. म्हणजेच इंटरनेट नसतानाही तो पाहणे प्रवाशांना शक्य होणार आहे. हे अँप्लिकेशन अनेक भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकामध्ये या यंत्रणेची चाचपणी सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसवण्यात येतील. मध्य रेल्वेवर ही संपूर्ण यंत्रणा बसवण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रवास खर्चाव्यतिरीक्त भारतीय रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जाहिरातींच्या माध्यमातून रेल्वेला पैसे मिळणार आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास आता काही महिन्यांमध्येच मुंबईकरांचा लोकलचा प्रवास मनोरंजक होणार आहे.

पश्चिम रेल्वेही देणार सुविधा

पश्चिम रेल्वेही आपल्या प्रवाशांना अशाप्रकारची सुविधा देण्याच्या तयारीत आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर अद्याप यासंदर्भातील चाचणी सुरु झालेली नसल्याचे समजते. सध्या अशाप्रकारच्या फ्री वायफायची सुविधा केवळ तेजस एक्सप्रेसमध्ये आहे. फरक इतकाच आहे की तेजस एक्सप्रेसमधील फ्री वायफायची सुविधा फक्त तेथील एलईडी स्क्रीनवर वापरता येते.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या