भारतासाठी धोक्याची घंटा

मुंबई : भारतीय संघाला वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. मायदेशात झालेला हा पराभव म्हणजे वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले. 

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर भारताने सलग तीन लढती गमावल्या. या मालिकेला वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून बघितले गेले होते. कारण, यानंतर आयपीएल स्पर्धा आहे. त्यानंतर थेट भारतीय संघ ३० मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होईल. येथील एका कार्यक्रमात बोलताना द्रविड म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपूर्वी अशी समजूत होती, की आपण इंग्लंडला जाणार आणि वर्ल्ड कप सहज जिंकणार. मात्र, असे काही नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला, ही चांगलीच गोष्ट आहे. कारण, हा पराभव आपल्याला वर्ल्ड कपमध्ये आठवण देत राहीन, की आपल्याला खूपच चांगले खेळावे लागणार आहे.’ या कार्यक्रमाला भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरही उपस्थित होता. द्रविड म्हणाला, ‘अर्थात, भारतीय संघात फलंदाजीचा चांगला समतोल साधला गेला आहे. मागील काही वर्षांत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यावरून लोकांना वाटत होते की जगात अव्वल असणारा भारतीय संघ वर्ल्ड कप सहज जिंकून आणेल.’ भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे द्रविड यांनी सांगितले असले, तरी या मालिकेतून काही विचित्र घडले असेही द्रविडला वाटत नाही. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये फेव्हरिट असेल. पण जेतेपद मिळवणे सोपे नसले. या वर्ल्ड कपमध्ये स्पर्धा तिव्र असेल, असेही द्रविडने नमूद केले

विश्रांतीपेक्षा खेळणे महत्त्वाचे 

या वर्ल्ड कपला स्पर्धेसाठी तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहण्यासाठी आयपीएलमध्ये किती वर्कलोड घ्यायचा हे प्रत्येक खेळाडूने ठरवायचे आहे, असे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले होते. काही खेळाडू दुखापतीतून सावरून या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्याचबरोबर काहींना या आयपीएलमध्ये दुखापत होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘या गोष्टी आता खेळाडूंना चांगल्या पद्धतीने कळतात. आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, हे त्यांना कळते. अशा स्थितीत खेळाडू कुठलीही जोखीम पत्करणार नाहीत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स एकदा म्हटला होता की मला विश्रांती घेण्यापेक्षा सातत्याने खेळत राहणे अधिक चांगले वाटते.


सर्वाधिक पसंतीच्या बातम्या