जळगावात भाजपने उमेदवार बदलला!

मुंबई : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विधानपरिषद सदस्य स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे.  चाळीसगावचे तरुण आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन नाराज होते. उमेदवार बदलून भाजपने त्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

भाजपने 26 मार्च रोजी प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या दुसर्‍या यादीत स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना डच्चू देत भाजपने विधानपरिषद सदस्य स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. वाघ यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, वाघ यांच्या उमेदवारीवर भाजपमधील एक गट नाराज होता. 

स्मिता वाघ या जिल्ह्यातील नेते एकनाथ खडसे यांच्या निकटवर्ती मानल्या जातात. खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर त्या गिरीश महाजन यांच्या गटात समील झाल्या होत्या. मात्र, स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यास महाजन यांचा विरोध होता. त्यांच्याऐवजी उद्योजक प्रकाश पाटील यांना उमेदवारी द्यावी असा महाजन यांचा आग्रह होता. या वादात जळगावची जागा धोक्यात येण्याची शक्यता होती. राष्ट्रवादीने तेथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. स्मिता वाघ यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. 

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या